romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, October 1, 2014

दिवेलागण...

त्या दिवशी अचानक दिवेलागण इस चीज का अहसास हुआ... बाहेर पडलो काही आणायला. साडेसहा संध्याकाळचे. उजेड होता पण दुकानांमधले, रस्त्यावरचे दिवे लागायला सुरवात झाली होती...
दिवेलागण... केरोसिनचा वास दरवळला अचानक मनात... राॅकेलचा... येशेल म्हणायची आजी ते गोडेतेलाला बहुतेक...
आजोळ जागं झालं पुन्हा... खूप दिवसांनी... माझं आजोळ...
चाळीस वर्षांपूर्वी गावात वीज नव्हती. निमशहरी गावाच्या दृष्टिनं चाळीस वर्षं म्हणजे फार मोठा काळ नव्हे. माझ्या आजोळच्या अनेक कारणांनी महत्व प्राप्त झालेल्या गावात तेव्हा तरीही वीज नव्हती हे खरं...
कंदील... तारांच्या सापळ्यात लंबगोलाकार काच बसवलेले, वर लावलेल्या तारेच्या लंबगोलाने तो कंदील स्वत:बरोबर कुठेही वाहून नेता यायचा...
चिमणी... लंबगोलाकार पितळेची छोटीशी बुधली. मोठी वात असलेली... काड्याचपेटीनं ती लावायची. मोठी ज्योत, त्यावर काजळीमय धुराची वर जात राहिलेली काळीभोर वळवळती जाड रेखा... चिमणी लवंडायची, कधी पेट घ्यायची... मोठ्या माणसांनी मुलांना सतत सावध करायचं. काम झालं की आजी हाताच्या एका फटका-यात शांत, गपगार करायची तिला... कुणाच्या नकळत किंवा कधी मी करतो, मी करतो म्हणून ती विझवायला- नव्हे शांत करायला गेलो तर हवेत वार केल्यासारखे कितीही हात मारले तर चिमणी ज्योत विरुद्ध दिशेलाच... मग फुंकरा मारायच्या. तसं करणं आणखी धाडसी. हे सगळं करत असताना मागावर असलेलं; आई, मावशी, मामी नाहीतर साक्षात आजी मागे यून उभी राहिली की मग कंबक्तीच.
या दिव्यांव्यतिरिक्त गोल बुधलीच्या तोंडावर गोलाकार दाते असलेली खाच. त्या खाचेत पेरुच्या आकाराची गोलाकार काच बसवलेले छोटे कंदील अधिक सुरक्षित... रात्रीच्या वेळी पायखान्यात न्यायला जास्त सोप्पे... बुट्टी असलेले पायखानेही किती दिवस होते वीज नव्हती त्या काळात... त्या बुट्ट्या खालच्या खाली ओढून मैला वहाणारे कर्मचारी... अंगावर शहारा येतो आज...
रात्र म्हणजे काळोखाचं साम्राज्य... निबिड काळोखाचं... आज चकचकाटाचं साम्राज्य आहे... दिवसाही विजेचा चकचकाट असतो अनेक ठिकाणी.
तेव्हा अंधार पडून निजेपर्यंत काय करायचं लहान मुलांनी?... मग मावशीनं सगळ्याना माडीवर न्यायचं. मोठ्या बुधलीवरचा अर्धा, पाऊणफूट उंचीचा स्टँड कंदील लावायचा... हा कंदील रोज अंधार पडायच्या आत साफ करण्याचं रोजचं एक मोठं काम असायचं. कंदीलाच्या काचेवरची काजळी साफ करायची. कापडानं पुसून जात नसेल तर राखेनं घासून पुसायची. खालची राॅकेलची टाकी भरायची. जाड आडव्या वातीची काजळी खुडून वात वर ओढायची...
हा मोठ्ठा कंदील लाऊन भोवतीनं बालगोपालांनी बसायचं. मावशीनं गोष्टी सांगायच्या. कधी इस्पिटानं- इश्पिटानं- पत्त्यानं खेळायचं... माडीच्या खाली काळोखं माजघर. तिथे दिवसाही डोळ्यात बोट घालूनही दिसायचं नाही. त्याच्या मागच्या अंगाला स्वैपाकघर. रात्रीचा चुलीचा धूर, त्याचा वास, अन्नपदार्थ शिजल्याचे वास माडीचर येत असायचे...
मावशीला डबलड्यूटी -दुहेरी काम असायचं. स्वैपाकघर ते माडी अशा तिच्या फेर्‍या चालू असायच्या...
तिच्या दोन येण्यांच्या मध्यंतरात वडील भावडं भिंतीकडे बोट दाखवायची आणि धाकल्यांना 'भूत भूत' करुन घाबरवायची... कंदीलाभोवतीनं बसलेल्या सगळ्यांच्या सावल्या दुप्पट, चौपट मोठ्या आणि काळ्याभोर होऊन, शेणाने सारवलेल्या, गेरु किंवा चुन्याचे हात फिरवलेल्या भिंतीवर; दबा धरुन बसल्यासारख्या दिसायच्या...
मावशी येऊन दांडग्यांना आवरेपर्यंत आणि लहानग्यांना जवळ घेईपर्यंत हा खेळ चालायचा. माझं आजोळ या इथेच या आधी लिहिलेल्या मालिकेतल्या एका नोंदीत मावशीच्या जाण्याचा उल्लेख आला आहे...
स्मरणातल्या त्याच त्या गोष्टी परत परत आठवत रहातात... शोभादर्शक यंत्रातून बांगड्यांच्या काचांच्या तुकड्यांची मांडणी दरवेळी वेगवेगळी दिसते तशा. पहिल्यापेक्षा नंतरची मांडणी वेगळी आणि आणखी मनोहर, सुंदर... काही वेळा व्याकूळ, अंतर्मुख करणारीही...
मावशी देवाघरी गेली. सगळी वडील भावंडे या ना त्या कारणाने दुसर्‍या शहरी स्थायिक झालेली... आजी-आजोबा एकटे आणि म्हातारपणी अपत्यमृत्यूचा चटका. मध्यरात्री आजीला दार ठोठावल्या्चे आणि 'आई दार उघड, मी आहे!' असे आवाज एकू येऊ लागले. एकदोनदा तिनं आजोबाना मध्यरात्री दार उघडायला लावलं... मग एके दिवशी आजोबांच्या धाकट्या भावानं हे बिर्‍हाड गावातच आपल्या शेजारी हलवलं...
आमचे काका आजोबा त्यावेळी एका चौसोपी वाड्याचं कारभारीपण पहात त्याच वाड्यात रहात होते...
पुढे गावात वीज आली...
काका आजोबा रात्री चौसोपी वाड्याच्या कानाकोपर्‍यातले लाईट्स बंद करायला खोलीबाहेर पडायचे तेव्हा त्यांच्या हातात कंदील हेलकावत असायचा. शेवटचा  विजेचा दिवा बंद केल्यावर गुडुप अंधारातून खोलीत परतताना हेलकावणारा कंदील हे एक प्रत्ययकारी दृष्य होतं...
मला हे समजलं एक कथा वाचताना. काका आजोबांच्या मुलीनं, माझ्या दुसर्‍या मावशीने लिहिलेल्या..,
ती कथा मी फारसं समजत नसताना एका मासिकात बघितलेली आठवते. वाचली पण वरच्या दृष्याखेरीज काही आठवत नाही. आईला वाचनाचं वेड होतं तिनं मला ती दाखवली होती. मावशीचा अशा कथांचा संग्रह प्रसिद्ध झाल्याचं कालांतरानं कळलं पण तो काही पहायला मिळाल्याचं आठवत नाही. बघायला मिळाला असेल तरी त्याचं महत्व त्यावेळी न कळण्याची अवस्था अस्मादिकाची होती...
मी लिहायला लागल्यावर तुझ्या कथा वाचायला दे म्हणून मावशीला विचारलं, मागे लागलो. माझ्याकडे काहीच नाही रे त्यातलं असं मावशी तिच्या गोड आवाजात, हसत सांगत राहिली. मी पुन्हा पुन्हा आठवण करत राहिलो.
मावशी आता एका विद्यापिठातून मुख्य ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाली आहे.
मी मधल्या काळातल्या अभ्यासासाठी प्रदक्षिणाचे खंड आणले. कालाप्रमाणे साहित्यिकांची जंत्री, माहिती, महत्व अशा प्रकारानी हे खंड उपयुक्त आहेत. प्रदक्षिणा च्या दुसर्‍या खंडात ज्येष्ठ समीक्षक श्री. म. द. हातकणंगलेकर सरांचा लेख आहे. साधारण १९७५ च्या सुमाराला उदयोन्मुख असणार्‍या स्त्री कथालेखिकांमधे मावशीचं नाव आहे... सुमती जाधव
मी मावशीला हे सांगितलं... ती पुन्हा गोड हसली... कथासंग्रह आता मलाच शोधावा लागणार आहे...
माझ्य़ा आजोळच्या नात्यांचा आणखी एक कोन, आणखी एखादा पदर मला खुणावतो आहे, खेचतो आहे...
दिवेलागणीच्या या संवेदनेनं मला तिकडे चांगलंच ओढलं आहे...
माझं आजोळ हे माझं महत्वाचं संचित आहे... 
(सर्व छायाचित्रं आंतरजालावरुन साभार)

No comments: